सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात एकच आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयात 100 टक्के जैन कोटा राखीव आहे. ही बाब शहरातील इतर समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. हा कोटा रद्द करून आणि सर्व समाजातील विद्यार्थ्यांना समान प्रवेश मिळावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. तसेच सोलापूर शहरात असलेल्या शेठ गोविंदजी आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर नाराजी व्यक्त करणारा फलक लावून आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सोलापूर शहरात असलेल्या शेठ गोविंदजी आयुर्वेदिक महाविद्यालयात अनेक विद्यार्थी बीएएमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. 198 विद्यार्थी क्षमता या संस्थेत आहे. या संस्थेत यापूर्वी इतर समाजातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता. मात्र संस्थेने शासनाचे 100 टक्के अनुदान घेत फक्त जैन समुदायातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे इतर समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. राज्य सरकारकडून राज्यातील अशा महाविद्यालयांना दिला जाणारे अनुदान बंद करावे किंवा सर्व समाजातील सर्व विद्यार्थ्यांना समान प्रवेश मिळावा, अशी व्यवस्था करण्याची मागणी सकल मराठा समाजाने मागणी केली आहे.
नाराजीचा फलक लावून निषेध करणार-
शंभर टक्के अनुदान घेत विशिष्ट समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याऱ्या आयुर्वेदिक महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालया समोर नाराजीचा फलक लावून निषेध सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. सदर पत्रकार परिषदेत माऊली पवार, गणेश डोंगरे, भाऊसाहेब रोडगे, गणेश देशमुख, लहू गायकवाड आदी उपस्थित होते.