सोलापूर - काँग्रेसकडून प्रत्येक तालुक्याला बोकड कापून मटणाच्या पार्ट्या दिल्या जात आहेत. मटणाच्या पार्टीतून मते मिळत नसतात त्यासाठी विकास कामे करावी लागतात, असा आरोप सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेसवर केला आहे. भाजपने विकास कामे केली आहेत, त्यामुळेच जनताही भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे मत पालकमंत्री देशमुख यांनी व्यक्त केले.
गेल्या ६० वर्षात काँग्रेसला विकास कामे करता आली नाहीत, त्यामुळेच जनतेने त्यांना नाकारले आहे. सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये बोकड कापून मटणाच्या पार्ट्या दिल्या जात आहेत. मटणाच्या पार्ट्या देऊन मते मिळत नसतात. त्यासाठी लोकांची विकास कामे करावे लागतात. काँग्रेसने विकास कामे केलेली नाहीत त्यामुळे जनता त्यांना स्वीकारणार नाही, असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. काँग्रेसकडून तालुक्यामध्ये मटणाच्या पार्ट्या देण्यात येत आहेत. मतदारांना अल्पकाळात आकर्षित करून निवडणुका जिंकता येत नाहीत. भाजपने पाच वर्षाच्या काळात विकास कामे केले आहेत. त्यामुळे जनता ही भाजपच्या पाठीशी उभी राहणार असल्याचा विश्वास, देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच काँग्रेस व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शुक्रवारपर्यंत भाजपचा उमेदवार जाहीर झालेला नाही तर दुसरीकडे काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी त्यांच्या प्रचार सभा सुरू झालेले आहेत तर दुसरीकडे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांची उमेदवारी जाहीर झालेली नसताना देखील त्यांना सोबत घेऊन भाजपकडून मेळावे घेतले जात होते. शुक्रवारी मध्यरात्री डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांची देखील उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.