मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता चार दिवस होताहेत. महायुतीला दणदणीत यश मिळालंय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय. निकालानंतर आम्ही लगेच सोमवारी शपथविधी घेऊ, असं महायुतीतील नेत्यांनी सांगितलं होतं. मात्र अजूनही महायुतीचे सरकार काही स्थापन झालेलं नाहीये. मुख्यमंत्रिपद, मंत्रिपद आणि खातेवाटप यावर एकमत होत नसल्यामुळं सरकार स्थापनेस विलंब होतोय. मिळालेल्या माहितीनुसार, आता 1 किंवा 2 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार आहे. एकीकडे शपथविधीस विलंब होत असताना दुसरीकडे मात्र मंत्रिपदासाठी अनेक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचं चित्र आहे. मंत्रिपदाची आस लावून बसलेले आणि मंत्रिपद मिळावे, अशी इच्छा व्यक्त करणाऱ्यांची सध्या भाऊगर्दी वाढताना दिसत आहे.
मला मंत्री झाल्यासारखं वाटतंय... : महायुतीतीत मुख्यमंत्री आणि मंत्रिपदावरून फॉर्म्युला तयार होत नाही. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. सुरुवातीला दोन वर्षं भाजपा त्यानंतर दोन वर्ष शिवसेना आणि एक वर्ष अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी महायुतीत खलबतं सुरू आहेत. मात्र शेवटी निर्णयप्रक्रिया दिल्लीतून हायकमांड आणि भाजपा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. अशातच मंगळवारी विधानसभेची मुदतवाढ संपल्यामुळं एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कार्यभार पाहतील, तर दुसरीकडे सरकार स्थापन आणि मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपाला 10 मंत्रिपदं आणि शिवसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी पाच-पाच मंत्रिपद देण्याबाबत फॉर्म्युला तयार झाला होता. मात्र यावर अंतिम निर्णय झालेला नसताना मात्र महायुतीतील तिन्ही पक्षांकडून अनेक आमदारांनी आपणाला मंत्रिपद मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली असून, मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचं अनेक आमदार सध्या पाहायला मिळताहेत.
काही आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार?: महायुतीचे मागील अडीच वर्षांपासून राज्यात सरकार आहे. भाजपाचे अधिक आमदार असूनही त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी छातीवर दगड ठेवून मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला होता, असं भाजपातील नेत्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी शिवसेनेतून बंड करून आलेले एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आले होते. त्यावेळी अनेक जण मंत्रिपदासाठी आशा लावून बसले होते. मात्र कित्येकांच्या पदरी निराशा पडली होती. मागील अडीच वर्षांपासून मंत्रिपद न मिळाल्यामुळं अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळं आतातरी आपणाला मंत्रिपद मिळावं, अशी इच्छा अनेक आमदारांनी व्यक्त केलीय. त्यामध्ये शिवसेनेचे प्रतोद आणि आमदार भरत गोगावले यांनीसुद्धा मंत्रिपद मिळावं, अशी इच्छा व्यक्त केलीय.
आपल्यालाही आता मंत्रिपद मिळणार- शिरसाट : मागच्या मंत्रिमंडळ विस्तारात आपण कोट शिवून घेतला होता. मात्र त्याचा वापर झाला नाही. आताही चार कोट शिवले आहेत. आता आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी आशा आहे, असं गोगावलेंनी म्हटलंय. दुसरीकडे मंत्रिपद न मिळाल्यामुळं आमदार संजय शिरसाट यांची सिडको महामंडळावर वर्णी लावण्यात आली होती. परंतु आपल्यालाही आता मंत्रिपद मिळेल, असा आशावाद संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय. भाजपाचे गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळावे, अशी इच्छा व्यक्त केलीय. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि चार वेळा आमदार राहिलेले मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनीही मतदारसंघातील लोकांची इच्छा आहे की, मुरबाड मतदारसंघाला यावेळी मंत्रिपद मिळावे, असं कथोरेंनी म्हटलंय.
सरनाईक यांनाही हवे मंत्रिपद : दुसरीकडे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनीही मंत्रिपद मिळावे, अशी इच्छा व्यक्त केलीय. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महायुतीचे सरकार येण्यासाठी ओबीसी मतदारांनी खूप सहकार्य केलंय. त्यामुळे आपली विधान परिषदेवर वर्णी लावून मंत्रिपद द्यावं, असंही ओबीसी नेते लक्ष्मण हकेंनी म्हटलंय. तसेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही मागच्यावेळी माझं मंत्रिपद हुकलं होतं. परंतु यावेळी मंत्रिपद मिळावं, अशी इच्छा व्यक्त केलीय. राजेंद्र गावित, दादा भुसे, सुहास कांदे, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, नितेश राणे, आशिष शेलार यांची नावंही मंत्रिपदाच्या चर्चेत असून, यांच्यातील काहींना मंत्रिपद मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकीकडे सरकार स्थापनेसाठी विलंब होत असताना दुसरीकडे मात्र राज्यात अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचं सध्यातरी चित्र दिसतंय.
हेही वाचा -