छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - विधानसभा निवडणुकांनंतर मुख्यमंत्री पदासाठी महायुती मधील घटक पक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात आपल्याच पक्षाचा नेता सर्वोच्च पदावर असावा यासाठी त्या-त्या पक्षातील नेते कार्यकर्ते आग्रही आहेत. भाजपातर्फे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असावे यासाठी देवाकडे धावा केला जात आहे. शहरातील प्रसिद्ध असलेल्या सुपारी मारुती मंदिरात त्यासाठी पूजन आणि महाआरती करण्यात आली. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सर्वच मंदिरांमध्ये अभिषेक आरती करण्यात येणार असल्याचं जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितलं.
सुपारी मारुती येथे महाआरती - विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी कौल दिलाय. मात्र मुख्यमंत्री कोण? आणि कोणत्या पक्षाचा, या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. भाजपा, शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी या तीनही पक्षातील नेते आपली ताकद पणाला लाऊन मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं यासाठी मोर्चे बांधणी करत आहेत. त्यामधे भाजपा पक्ष सर्वाधिक जागा जिंकल्यानं पक्षातील पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करा अशी मागणी करत आहेत. इतकंच नाही तर देवाकडे देखील साकडं घालत आहेत. मंगळवारी शहरातील सर्वात जुन्या आणि नवसाला पावणाऱ्या सुपारी हनुमान मंदिरात भाजपा जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वात महाआरती आणि पूजा केली. देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या योजना राबवल्या. त्यांच्यावर होणाऱ्या टीकांना संयमाने निवडणुकीत उत्तर दिलं. मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस पात्र आहेत आणि त्यांची निवड व्हावी यासाठी देवाकडे साकडं घालत असल्याचं जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितलं.
जिल्ह्यातील सर्व मंदिरात होणार पूजा - राज्यात भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक यश मिळालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर पक्षाचा अधिकार आहे. दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून सन्मान द्यावा याकरता मागणी केली आहे. मंगळवारी सुपारी हनुमान मंदिरात आरती केल्यानंतर जिल्ह्यात वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आरती, महापूजा, अभिषेक करण्यात येणार आहे. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत, तोपर्यंत देवाकडे आम्ही आमची मागणी करत राहणार अशी माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी दिली.
हेही वाचा..