पंढरपूर - शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होते आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्राशानाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यकतेनुसार देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत खासगी रुग्णालयांनी कोविड नियमांचे तंतोतंत पालन करावे, या इंजेक्शनचा कुठेही काळाबाजार अथवा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळावेत यासाठी खासगी डॉक्टर, औषध विक्रेते यांची प्रांत कार्यालय सास्कृंतिक भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम, पोलीस निरिक्षक अरुण पवार, किरण अवचर, प्रशांत भस्मे, खासगी डॉक्टर व औषध विक्रेते उपस्थित होते.
रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपावर प्रशासनाचे नियंत्रण -
कोरोनाबाधित रग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपावर प्रशासनाचे नियंत्रण असून, रेमडेसिवीर इंजेक्शनची खासगीरित्या कुठेही विक्री होणार नाही. अन्न औषध प्रशासनाच्या संनियंत्रणात खासगी कोविड रुग्णालयात इंजेक्शन विक्री करण्यात येईल. खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या यानुसार रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात येईल. उपलब्ध रेमडेसिवीर इंजेक्शन गंभीर रुग्णांना प्राधान्याने गरजेनुसार द्यावे. रुग्णांनी डॉक्टरवर विश्वास ठेवावा. डॉक्टरांनी कोणत्याही रुग्णाला बाहेरून रुग्णांना इंजेक्शन आणायला लावू नये. उपलब्ध रेमडेसिवीर इंजेक्शनपैकी 10 टक्के साठा हा फ्रंटलाइन वर्कर्ससाठी ठेवण्यात येईल असेही, प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.
रुग्णालयांनी व औषध विक्रेत्यांनी कोविड नियमांचे पालन करा -
तालुक्यात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरी भागात वार्डस्तरीय समिती व ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती कार्यरत ठेवाव्यात. रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी कोविड केअर सेंटरच्या उभारणीकरण्यासाठी आवश्यकती कार्यवाही करावी. औषधांचा काळा बाजार व साठेबाजीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी रेमडेसिवीर वर नियंत्रण आणले आहे. रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यासाठी जिल्हास्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व खासगी रुग्णालयांनी व औषध विक्रेत्यांनी कोविड नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, अशा सूचनाही गुरव यांनी यावेळी दिल्या.
शहरातील रूग्णालयाच्या औषध साठ्याचा आढावा -
यावेळी शहरातील लाईफ लाईन, गणपती, ॲपेक्स, जनकल्याण, वरदविनायक, गॅलक्सी आदी रूग्णालयांमधील औषधसाठ्याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांनी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्ण, उपचार घेत असलेले रुग्ण, बरे झालेले रुग्ण, याबाबत तसेच आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती दिली.