सोलापूर- आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या अधिकाधिक भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी आजपासून 24 तास दर्शन सुरु करण्यात आले आहे. आजपासून देवाचे नित्योपचार बंद करण्यात आले आहेत. 21 जुलैपर्यंत 24 तास दर्शन सुरु राहणार आहे.
मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते आज सकाळी विठ्ठलाची पूजा करून पलंग काढण्यात आला. त्यानंतर देवाला गादीचा लोड देण्यात आला. प्रक्षाळ पूजेपर्यंत देव आपल्या भक्तांना दर्शनासाठी 24 उभा असतो. या काळात देवाची सकाळी नित्यपूजा, दुपारी नैवद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी देण्यात येते. त्यामुळे देवाचे नित्योपचार बंद राहणार आहेत.
विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू झाल्याने दर्शनाचा वेग वाढला आहे. प्रतितास 2 हजार 400 या प्रमाणे दिवसात 45 ते 48 हजार भाविकांना विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाचा लाभ होईल, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले म्हणाले.
आषाढी वारीच्या महासोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक मजल-दरमजल करत विठुनामाच्या गजरात पंढरीकडे येऊ लागले आहेत. आषाढी वारीचा मुख्य सोहळा 12 जुलै रोजी साजरा होत आहे.