सोलापूर - जुन्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना सोलापूरमध्ये घडली. या घटनेतील आरोपीला 12 तासांच्या आत अटक केली असून रवी बाबू रणखांबे (37), असे आरोपीचे नाव असून सुरेश बबन गायकवाड (26) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.
दारू पाजून मित्राने मित्राचा काटा काढला -
सुरेश गायकवाड आणि रवी रणखांबे या दोघांची घट्ट मैत्री होती. सुरेश गायकवाड हा रिक्षा चालवत होता. तर रवी रणखांबे हा बांधकाम मजूर होता. दोघेही सोमवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास दारू पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसले. सुरेशला भरपूर नशा चढल्यावर रवीने सुरेशचे डोके दगडावर आपटले. यामध्ये सुरेशचा जागीच मृत्यू झाला.
एक महिन्यापूर्वी दोघांत झाले किरकोळ भांडण -
एक महिन्यांपूर्वी सुरेश आणि रवीमध्ये किरकोळ हाणामारी झाली होती. सुरेश हा बलशाली असल्याने त्याने रवीला खाली पाडून मारले होते. याचा राग रवीच्या मनात होता. अखेर या भांडणाचा राग मनात धरून रवी ने सुरेशचा सोमवारी मध्यरात्री काटा काढला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना मिळाला सुगावा -
सुरेश गायकवाड या रिक्षा चालकाचा मृतदेह मिळताच भीम नगर व मुळेगाव परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एका हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये दोघे जाताना दिसले. मात्र, परत आलेच नाही. संशयित आरोपी रवी याने चलाख बुद्धीचा वापर करत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसता कामा नये म्हणून त्याने शेतातून आणि वेगळ्या मार्गाने घर गाठले. पोलिसांनी भीम नगर परिसरात दोघांबद्दल माहिती घेतली आणि मागील भांडणाची माहिती घेतली. त्यानंतर संशयित आरोपी रवी रणखांबे यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला.
हेही वाचा - ''मोटेरा आणि चेन्नईतील खेळपट्टी भाजी पिकवणाऱ्या मैदानांसारखी''