सोलापूर - कुर्डुवाडी येथील व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या आणि त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या चौघा संशयित आरोपींना पकडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या संशयित आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. मल्हारी उर्फ भैया विश्वनाथ लेंगरे (वय-32), पृथ्वीराज उर्फ गणेश गायकवाड (वय-32), सुरज ज्योतीराम भोसले (वय-30), गणेश गोपीनाथ कापरे (वय-30) (सर्व राहणार कुर्डुवाडी तालुका माढा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
23 मे रोजी कुर्डुवाडी येथील व्यापारी ढवळसकर हे आपले भाऊ प्रवीण कुमार सोबत आपले दुकान बंद करून घरी जात होते. सोबत हिशोबाच्या डायरी देखील पिशवीमध्ये घेतली. सायंकाळी आपल्या दुचाकीवरून जात असताना देशमुख हॉस्पिटलसमोर आले असता तिन्ही संशयित आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. पैशाची पिशवी समजून हिशोब असलेली डायरीची पिशवी हिसकवण्याचा प्रयत्न करू लागले. ढवळसकर बंधूंनी त्यास विरोध केला असता, आरोपींनी त्यांवर गोळीबार केला.
प्रवीणकुमार यांच्या काखेत गोळी लागली. पिशवी हिसकावून आरोपी घटना स्थळावरून पळून गेले. याबाबत कुर्डवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पैशाची पिशवी समजून हिशेबाच्या डायऱ्या पळविल्या आहेत. गंभीर गुन्हा असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. शुक्रवारी गुन्हे शाखेला खबर मिळाली की, ढवळसकर बंधुवर हल्ला करणारे भैया लेंगरे, पृथ्वीराज उर्फ गणेश गायकवाड यांनी कट रचून पिंटू गुप्ते, व त्याच्या एका मित्रा सोबत तसेच सूरज भोसले, गणेश कापरे हे बायपास रोडवरील टेंभुर्णी चौकात साई हॉटेल जवळ थांबले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साई हॉटेलकडे मोर्चा वळविला. तेथे गेल्यावर चारही आरोपी एचएफ डीलक्स घेऊन थांबले होते. त्यांकडे जाऊन, त्यांची झडती घेतली असता 1 पिस्तुल 2 जिवंत काडतुसे, एक दुचाकी वाहन, असे साहित्य सापडले.
पृथ्वीराज गायकवाड याची अधिक विचारपूस केली असता त्याने भैया लेंगरे यास कुर्डवाडी येथील व्यापाऱ्यावर गोळीबार करून लुटण्याचे काम दिले होते. त्यानुसार पिंटू गुप्ते, सूरज भोसले, गणेश कापरे यांनी ढवळसकर यांवर 23 मे रोजी हल्ला केला होता. अशी कबुली दिली. हल्ल्यामध्ये वापरलेला पिस्तुल सुरज भोसलेकडे ठेवले असल्याचे सांगितले.
पोलिसांनी 20 हजार रुपयांचा पिस्तुल, 600 रुपयांचे दोन जिवंत काडतुसे, 25 हजार रुपयांची दुचाकी वाहन असे एकूण 45 हजार 600 रुपयांचा मुददेमाल हस्तगत केला. स्थानिक गुन्हे शाखेने चारही आरोपींना कुर्डवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले असून, चौघांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी सहायक पोलीस फौजदार ख्वाजा मुजावर, गोरक्षनाथ गांगुर्डे, राजेश गायकवाड, नारायण गोलेकर, दिलीप राऊत, मोहन मंसावाले, लालसिंग राठोड आदींनी केली.