पंढरपूर - शहर पोलिसांनी अवैधरित्या वाळू चोरी प्रकरणात अमर पाटील याला अटक केली होती. न्यायालयाकडून त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र पोलीस कोठडीत वाढ होऊ नये, म्हणून विशाल काटे नावाच्या व्यक्तीने तक्रारदाराकडे चार लाख रुपयांची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारत असताना लाचलुचपत विरोधी पथकाने कारवाई केली असता, आरोपी 70हजार रुपये घेऊन फरार झाला आहे. या प्रकरणी काटे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार लाख रुपयांची लाचेची मागणी..
अवैधरित्या वाळू चोरीत तक्रारदार याचा भाऊ अमर पाटील याच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. त्या पोलीस कोठडीत वाढ होऊ नये, म्हणून आरोपी विशाल काटे याने तक्रारदार व्यक्तीकडे चार लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती.
ठरल्या प्रमाणे आरोपीला पहिला हप्ता 2 लाख रुपयांचा हप्ता घेण्यासाठी आला असता, तक्रारदराने 70 हजार दिले. मात्र आरोपीने ते पैसे घेऊन पलायन केले. याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.