पंढरपूर (सोलापूर)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल तीन महिने संचारबंदीची झळ सहन केल्यानंतर पंढरपूर शहरात आता पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्याचे वारे वाहू लागले आहे. आषाढी यात्रा कालावधीत २९ जून ते २ जुलै या काळात चार दिवसांची संचारबंदी लावण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे पंढरपूर आणि परिसरातील नागरिक, महाराज मंडळी आणि व्यापारी वर्गातून नाराजीचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत. या प्रकरणी आता आमदार भारत भालके हे याबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
कोरोना महामारीच्या सावटामुळे यंदा आषाढी यात्रेची गर्दी पंढरीत पाहायला मिळणार नाही. मात्र, आषाढी वारीची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी शासनाने मानाच्या नऊ पालख्या व काही मोजके मानकरी यांना आषाढीसाठी पंढरीत येण्यास परवानगी दिलेली आहे. तसेच सध्य स्थितीत पंढरपुरात कोरोनाचा कोणताही प्रादुर्भाव नाही. मात्र, प्रशासनाकडून आषाढी वारी काळात पुन्हा संचारबंदी लागू करण्याचा निर्णय कशासाठी घेतला आहे, असा सवाल आता नागरिकांमधून केला जात आहे.
आषाढीच्या निमित्ताने दर्शनासाठी पंढरीत गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने २९ जून ते २ जुलै दरम्यान पंढरपूर आणि दहा किमी परिसरात संचारबंदी लागू करण्याच्या हालचाली सुरू केली आहे. शासनाच्या आदेशाने मंदिर तर बंदच आहे. परंतु जवळपास तीन महिने व्यापारी आपली दुकाने उघडू शकलेले नव्हते. या प्रदीर्घ बंदमुळे पंढरीचे आर्थिक चक्र जागीच थांबले असून छोटे व्यापारी तर यातून सावरणे अशक्य असताना पुन्हा चार दिवसांची संचारबंदी त्रासदायक ठरणार असल्याचे मत व्यापारी वर्गातून व्यक्त केले जात आहे.
आषाढी काळात संचारबंदी लागू न झाल्यास भाविकांची गर्दी वाढू शकते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविकांसाठी बाहेरच उपाययोजना करावी आणि येणारी गर्दी रोखावी, स्थानिक नागरिकांना पुनः संचारबंदीला सामोरे जायला लागू नये, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.