सोलापूर - भिमा नदी पात्रात लवंगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील तानवडे व पारशेट्टी परिवारातील चारजण वाहून गेल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजता घडल्याची माहिती मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन थिटे यांनी दिली. समीक्षा शिवाजी तानवडे (वय 13 वर्ष) अर्पिता शिवाजी तानवडे (वय 12 वर्ष) आरती शिवानंद पारशेट्टी (12 वर्ष) विठ्ठल शिवानंद पारशेट्टी (वय 10 वर्ष) अशी मृत्यू झालेल्या कोवळी मुलांची नावे आहेत.
हेही वाचा - सोलापूर : महापालिका आयुक्तांनी कोरोनाबाधितांचा आकडा लपवला - सोमैया
शिवाजी रामलिंग तानवडे (वय 40 वर्ष रा. लवंगी ता. दक्षिण सोलापूर) हे आज दुपारी भीमा नदी पत्रात पोहायला गेले. नदीत पोहायला गेलेल्या वडिलांच्या मागे अर्पिता व समीक्षा या मुली गेल्या. तसेच, तानवडे यांच्या बहिणीचा नऊ वर्षांचा मुलगा विठ्ठल पारशेट्टी व अकरा वर्षांची मुलगी आरती पारशेट्टी हे दोघेही नदीच्या दिशेने आले. तानवडे यांच्या 12 वर्षीय मुलीला व त्यांच्या बहिणीच्या 12 वर्षीय मुलीला पोहायला येत असल्याने त्या दोघीही नदीत उतरल्या. त्यानंतर नदी काठावरील तानवडे यांची नऊ वर्षीय मुलगी आणि बहिणीचा 11 वर्षांचा मुलगाही पाण्यात उतरला. परंतु, प्रवाह वाढल्याने चारही मुले वाहून जाताना शिवाजी तानवडे यांनी पाहिले.
शिवाजी तानवडे यांनी वाचवण्यासाठी प्रयत्न केला,पण मुले निसटली
शिवाजी तानवडे यांनी सुरवातीला त्यांच्या जवळ असलेल्या दोन मुलांना धरले आणि नदी काठावर आणून सोडले. नदी काठावर आल्यानंतर पाणी थोडे असल्याने ते दोघेही सुखरूप जातील असा त्यांना विश्वास होता. त्यानंतर ते दुसऱ्या दोघांना आणायला गेले. मात्र, तोवर प्रवाह वाढल्याने ते वाहून गेले. दरम्यान, काठापर्यंत सोडलेली दोन्ही मुलेही वाहून गेली होती, अशी हृदयद्रावक हकीकत शिवाजी तानवडे यांनी मंद्रुप पोलिसांसमोर सांगितली. या घटनेमुळे लवंगी गावावर शोककळा पसरली आहे. मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन थिटे यांनी तानवडे आणि पारशेट्टी कुटुंबीयांची भेट घेतली आणि चारही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवले.
हेही वाचा - पंढरपूरचा कोरोना मुक्तीसाठी लढा, 11 गावांकडून कोरोना हद्दपार