सोलापूर - करमाळ्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा मुलगा शंभुराजे जगताप याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, रणजितसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये शंभुराजे जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. शंभुराजे हे दिवंगत नामदेवराव जगताप यांचे नातू आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघाची जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या घटकांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. तर संजय शिंदे यांना धडा शिकविण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे माढ्यात प्रचाराला उतरले आहेत. त्यासाठीच माढा लोकसभा मतदारसंघातील अनेकांना आश्वासने देऊन भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत झालेल्या हाणामारीमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या विरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. मागील काही महिन्यांपासून जयवंतराव जगताप यांना अटकपूर्व जामीन मिळालेला नाही. जयवतंराव जगताप यांना अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता जयवंतराव जगताप यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता लवकरच जयवंतराव जगताप यांना देखील जामीन मिळाल्यानंतर तेही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
जगताप गटाच्या प्रवेशामुळे भाजप व महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असून, शंभुराजेंना पक्षाकडून ताकद देऊन यथोचित सन्मान देऊ असेही महसूलमंत्री पाटील म्हणाले. जगताप गटाच्या प्रवेशामुळे करमाळ्यात भाजपची ताकद वाढली आहे. याचा परिणाम येत्या लोकसभा निवडणुकित निश्चित होऊन माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
प्रवेशानंतर शंभुराजे जगताप म्हणाले, भाजप पक्षाच्या ध्येय धोरणांमुळे व देशात व राज्यात झालेल्या विविध विकास कामांनी मी प्रेरित झालो म्हणून जगताप गटाच्या कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करत आहे. भविष्यात पक्ष देईल ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडू. पक्षातील नेत्यांनी मला काम करण्याची संधी द्यावी. जगताप गटाच्या वतीने येत्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्य देऊ, असे शंभुराजे म्हणाले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, रामलाल परदेशी, बार्शीचे नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, माजी उपनगराध्यक्ष नारायण बापू जगताप, पंचायत समिती सदस्य नागनाथ लकडे, रोहिदास सातव, आण्णासाहेब पवार, दादासाहेब जाधव, दादा कोकरे, हनुमंत फंड, सागर दोंड आदी उपस्थित होते.