सोलापूर - करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवड प्रक्रियेवेळी झालेल्या हल्ल्याप्रकरणी करमाळा न्यायालयाने माजी आमदार जयवंतराव जगताप यांना १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी जगताप स्वतः करमाळा पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३ ऑक्टोबर २०१८ रोजी सभापती निवडीच्या सभेपूर्वी शिवाजी बंडगर यांनी बंडखोरी करून बागल गटात प्रवेश केला होता. या कारणावरून शिवाजी बंडगर व दिग्विजय बागल यांच्यावर हल्ला झाल्याची फिर्याद दिग्विजय बागल यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली. यानंतर पोलिसांनी माजी आमदार जयवंतराव जगताप त्यांचे पुत्र नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, शंभूराजे जगताप यांच्यासह सहा जणांविरोधात भा.द.वी ३०७ चा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, शंभूराजे जगताप यांच्यासह चार जणांना जामीन मिळाला आहे. मात्र, माजी आमदार जयवंतराव जगताप यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. मात्र, तब्बल ९ महिन्यांनी ते करमाळा पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाले.
करमाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी जयवंतराव जगताप यांच्या अटकेची कारवाई केली. त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. न्यायालयात उभे केल्यानंतर न्यायाधीशांनी जयंतराव जगताप यांना १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.