सोलापूर - देश हा जातीवाद आणि धार्मिक वादावरच चालला आहे. त्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात विधान केले. ज्येष्ठ विचारवंत अरुंधती रॉय यांनी मनुवाद आणि मानिवाद यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली असल्याचे मत एल्गार परिषदेत व्यक्त केले होते. त्यावर बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी आपले अप्रत्यक्ष समर्थन रॉय यांना दिले.
काय म्हणाल्या अरुंधती रॉय -
प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी एल्गार परिषदेला संबोधित करताना भाजप, केंद्र सरकार आणि आरएसएसवर जोरदार हल्ला केला. भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष असून तो हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली देशावर मालकी गाजवू पाहत आहे. लपून वार करणे, तसेच दहशत निर्माण करण्याबरोबरच हुकूमशाही लादण्याचे काम देशात सुरू आहे. मनुवाद आणि मानिवाद यावरून देशाची लोकशाही धोक्यात आली आहे, अशा परखड शब्दात अरुंधती रॉय यांनी मोदी सरकारवर टीका केली. एल्गार परिषद ही भारतीय राज्यघटनेविरोधी काम करणारी परिषद नाही, असे सांगताना रॉय यांनी आरएसएसवर हल्लाबोल केला. देशातील दलितांवर खुलेआम अत्याचार होत आहेत. लव्ह जिहादविरोधी निर्णय घेतले जात आहेत, अशी रॉय यांनी सडकून टीका केली.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले-
देश हा जातीवाद आणि धार्मिकवादावरच चालला आहे. गरिबांचे श्रीमंत राजकारण करत आहेत, असे शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले. या वक्तव्यातून त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक अरुंधती रॉय यांच्या विचारांना पाठिंबा देत केंद्र सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांशी संबंधित तीन कायदे रद्द केले तर सर्व वाद संपुष्टात येईल आणि शेतकरी आंदोलन मागे घेतील, असे शिंदे म्हणाले.