पंढरपूर - राज्यात कोरोनाची दहशत असल्यामुळे राज्य सरकारने गेल्या दीड वर्षापासून लॉक अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये कोरोनाचे सावट असल्याचे दिसते. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून फुलांच्या बाजारालाही कोरोनाचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. पंढरपुरातील फुल बाजाराला गेल्या दीड वर्षापासून लाखो रुपयांचा फटका बसला आहे. पंढरपूर शहरातील फुलांचा बाजार हा प्रामुख्याने विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर अवलंबून असतो. पंढरपूर शहरात रोज होणारा फुलांचा लिलाव आता दोन दिवसावर आला आहे. ज्यामुळे फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर ही फूल शेतीवर नांगर फिरवण्याची पाळी आली आहे. यामुळे पंढरपुरातील लाखो रुपयांचा फूल बाजार हा कोरोनाचा संकटात सापडला आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर अवलंबून असलेल्या फुल विक्रेत्यांना घरघर -
वैष्णवांचे दैवत असणारे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर कोरोना संकटात लॉक अनलॉक प्रक्रियेतून बंद चालू ठेवण्यात आले होते. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. यामध्ये छोटा व्यापार असणाऱ्या फूल विक्रेत्यांना मात्र गेल्या दीड वर्षापासून घरघर लागल्याचे दिसून येत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात सुमारे 50 ते 60 फूल विक्रेते आपल्या घराचा गाडा फुलांच्या विक्रीतून चालवत असतात. पंढरपूर तालुक्यातील फूल शेती ही विठ्ठल-रुक्मिणी मातेला वाहण्यात येणाऱ्या फुलांच्या विक्रीवर बर्यापैकी आधारलेली आहे. सुमारे 60 टक्के फुले मंदिर परिसरातील फूल विक्रेते लिलाव पद्धतीने विकत घेत असतात.
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर फूल शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ -
पंढरपूर तालुका हा फळबागाची शेती वर आधारलेला तालुका आहे. मात्र, त्याच प्रमाणे पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी फूल शेती ही करतो. मात्र, गेल्या दीड वर्षापासून पंढरपूर तालुक्यावर कोरोनाची सावट आहे. विठ्ठल व रुक्मिणी मंदिरावर आधारित असणाऱ्या फूल व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंढरपूर शहरातील फूल बाजारात होणाऱ्या लिलाव विक्रीला विक्रेते नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या फुलांचे मोठे नुकसान होते आहे. पंढरपूर शहरातील बाजारातून दररोज शंभर ते दीडशे टन फुलांची आवक जावक होत असते. मात्र, कोरोणाच्या पार्श्वभूमीवर फूल बाजारात आठवड्यातून दोन दिवस लिलाव केला जातो. त्यातून केवळ 50 ते 60 टन इतकी फुलांची आवक जावक होते. बाजारात विक्रीस असणाऱ्या गुलाब, झेंडू आणि इतर फुलांच्या किमतीमध्येही कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे हाताश झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या फूल बागायत शेती वर नांगर फिरवल्याचे दिसत आहे.
संचार बंदीच्या काळात माळी व्यवसायावर उपासमारीची वेळ -
पंढरपूर शहरातील विठ्ठल व रुक्मिणी मंदिर तसेच इतर सणासुदीला फुलांची प्रचंड प्रमाणात आवक-जावक होत असते. त्यासाठी विक्रीते भल्या पहाटे उठून शहरातील महात्मा फुले फूल विक्री बाजारामध्ये गर्दी करत असतात, त्यामुळे शेतकऱ्यांकडून फूल बाजारात फुलांचे भलेमोठे ढीग सणासुदीच्या आदल्या दिवशी विक्रीसाठी ठेवले जातात. मात्र, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पाच मोठ्या वारी यात्रा कोरोना सजावटामुळे होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे परंपरागत व्यवसाय असणाऱ्या माळी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील 70 टक्के माळी समाज हा फुलांची विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवत असतो. मात्र, फुले अत्यावश्यक सेवेत येत नसल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून फुलबाजार बंद पडण्याच्या स्थितीत आहे. राज्य सरकार कडून सर्व व्यवहार सुरळीत करावेत, त्यामुळे इतर उद्योगांबरोबर फूल व्यवसायालाही चालना मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षाही माळी समाजाकडून व्यक्त होत आहे.