पंढरपूर (सोलापू) - उजनी धरणातून सोडलेले पाणी पंढरपूरमध्ये पोहोचले आहे. त्यामुळे चंद्रभागेला पूर आला आहे. पुराचे पाणी विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर आले आहे. पंढरपूरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, तब्बल 8 हजार कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
पंढरपूरकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. शहराच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे. शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, रुक्मिणी मंदिर, गोविंदपुरा, आंबेडकर नगर, दत्तनगर परिसरामध्ये 6 फुटापर्यंत पाणी आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने ही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांना देखील सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. पंढरपूरकडे येणारे सातारा, पुणे सोलापूर, मंगळवेढा या ठिकाणची वाहतूक बंद केली आहे, तर काही ठिकाणची वाहतूक वळविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.