सोलापूर- उजनी धरणातून भीमानदी पात्रात २ लाख ५० हजार क्युसेक्स , तर वीर धरणातून नीरा नदीत ३२ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे, पंढरपूर येथील चंद्रभागेमध्ये १ लाख ८२ हजार क्युसेक्स पाणी आले आहे. त्यामुळे, चंद्रभागेला महापूर आला आहे.
२००७ नंतर १३ वर्षांनी चंद्रभागेला महापूर आला आहे. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठालगत असलेली सुमारे सहा हजार कुटुंबे बाधित झाली आहेत. एक हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
दरम्यान, पुराच्या पाण्यामुळे पंढरपूर-सातारा, पंढरपूर-पुणे, पंढरपूर-विजापूर, पंढरपूर-सोलापूर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंढरपूर शहरालगतचा नवीन पूल आणि अहिल्यादेवी हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
मागील चार ते पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. चंद्रभागेला आलेल्या पुरामुळे शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, आंबेडकर नगर, आंबाबाई पटांगण, लखुबाई मंदिर आदी सखल भागात पाणी शिरल्याने येथील सुमारे एक हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
उजनीतून पाणी सोडल्याने भीमा नदीकाठच्या सुमारे ५५ गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व गावांना जोडणारे मार्गदेखील बंद झाले आहेत. तेथील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे कासाळगंगा ओढ्यालाही पूर आला आहे. ओढ्याकाठच्या नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना, नीरा, बोरी, भोगावती, नागझरी या नद्यांसह मोठे ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. महापुरामुळे जिल्ह्यातील ४ हजार ५२२ घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. महापुरामुळे ४ हजार ७३१ कुटुंबातील १६ हजार ९५४ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नदी, नाले व ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने जवळपास १७९ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. या महापुरात आतापर्यंत ३६५ जनावरांचाही मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील १ हजार ३३८ घरांची पडझड झाली आहे.