सोलापूर - महाराष्ट्रसह देशभरात प्रसिद्ध असलेले वनपुरुष मारुती चितमपल्ली आपल्या मूळ गावी सोलापूरात पोहोचले. सोमवारी पहाटे 2 च्या सुमारास त्यांचे सोलापुरात आगमन झाले. गेली 45 वर्ष विदर्भात वास्तव्य केल्यानंतर त्यांनी शेवटचे क्षण सोलापुरातील मूळ घरी नातेवाईकांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला.
वन खात्यातील नोकरी निमित्त 45 वर्षा पूर्वी मारुती चितमपल्ली विदर्भात गेले होते. नवेगाव, नागझिरा, मेळघाट हे जंगल त्यांचे कार्यक्षेत्र होते. निवृत्तीनंतर त्यांनी नागपूर येथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. कारण नागपूरच्या 25 किमी परिसरात चोहोबाजुनी जंगल आहे. निसर्ग, पक्षी, प्राणी यांचा अभ्यास यापेक्षा कुठेही शक्य नाही, असे म्हणतात.
पत्नीच्या निधनानंतर थोडे सावरले असताना मुलगी छाया सोबत नागपुरात राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, छायाच्या मृत्यूनंतर वनपुरुष मारुती चितमपल्ली एकटे पडले होते. त्यांचे पुतणे श्रीकांत चितमपल्ली यांनी मारुती चितमपल्ली यांना आपल्या मूळ गावी म्हणजेच सोलापुरातील राहत्या घरी (संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड, मणीधाम) येथे आणण्याचा निर्णय घेतला.
रविवारी सकाळी त्यांनी वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ येथून सोलापूरसाठी प्रवास सुरु केला. जड अंतःकारणाने मारुती चितमपल्ली यांनी विदर्भ सोडले. सोमवारी पहाटे त्यांनी सोलापुरात प्रवेश केला. दिवसभर विश्रांती नंतर सायंकाळी 4 च्या सुमारास सोलापूर वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घरी जाऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी इर्शाद शेख, वनपाल चेतन नलावडे, शिवाजी गावडे, मुन्ना नरवणे आदींनी पुष्पगुच्छ देऊन व रोप भेट देत स्वागत केले.