सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटं घरातील लाईट बंद करुन दिवे लावावे किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करावी, या आवाहनास माढा शहरवासियांनी संमिश्र प्रतिसाद दिला.
आमदार बबनराव शिंदे यांनी कुटुबिंयांसमवेत दिवे लावले. माढा शहरात मात्र काही तुरळकच ठिकाणी दिवे पेटवले गेले तर काहींनी मोबाईलची फ्लॅश लाईट व मेणबत्ती लावल्याचे दिसून आले. माढ्यातील शिखरकर गल्ली व शुक्रवार पेठेतील नागरिकांचा अधिक प्रतिसाद दिसून आला. इतर भागात मात्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही.
माढा शहरातील विद्युत पुरवठा खंडीत केला गेलेला नव्हता. माढ्यातील डॉ. अभयकुमार लुणावत यांनी कुटुबिंयांसमवेत पणत्या लावल्या तसेच अन्य डॉक्टरांनीदेखील बॅटरीचा उजेड केला होता. भुमाता शेतकरी संघटनेच्या अॅड. रत्नप्रभा जगदाळे यांनी कुटुबिंयांसमवेत दिवे प्रज्वलित केले.