सोलापूर - करमाळा येथील मौजे साडे या गावच्या महिला सरपंचाच्या पतीस एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडले आहे. नवनाथ लक्ष्मण बदर (वय 57 रा. मौजे साडे ता. करमाळा जि. सोलापूर) असे लाचखोर व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत मौजे साडे येथील नागरिकांना 40 शौचालय मंजूर झाले होते. ठेकेदाराकडून नागरिकांना शौचालय बांधून दिल्यानंतर बीडीओ कार्यालयातून त्याचे बिल मिळणार होते. शासनाकडून शौचालय बांधून झाल्यावर प्रत्येकी 12 हजार मिळणार होते. तर, ठेकेदाराने जानेवारी 2020 मध्येच शौचालय बांधून दिले. परुंतु, त्याचे बील अद्यापपर्यंत मिळाले नसल्याने ठेकेदार बीडीओ कार्यालयाचे चकरा मारत होता.
साडे गावातील बांधलेल्या शौचालयांच्या बिलासाठी ठेकेदार पाठपुरावा करत होता. मौजे साडे गावच्या महिला सरपंचाचे पती नवनाथ बदर याने याकरता 1 लाख रुपयांची लाच मागितली. व 12 शौचालयांची बिल मंजूर झाली आहेत. उर्वरित 32 शौचालयांची बिलं मंजूर करून देतो असे सांगत लाचेची रक्कम मागत तगादा लावला होता.
शेवटी ठेकेदाराने सोलापूर अँटी करप्शन सोलापूर कार्यालय गाठले व रितसर फिर्याद दाखल केली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर युनिटने सापळा रचला. त्यानुसार एक लाख रुपयांमधील पहिला हप्ता 40 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी सकाळी ही लाच घेताना नवनाथ बदर याला रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई उपअधीक्षक संजीव पाटील, निरीक्षक कविता भोसले, संजयकुमार बिराजदार, पकाले, घाडगे आदी पोलीस कर्मचारी यांनी केली.