सोलापूर : हिंदू धर्मात (Hindu Religion) नागाला पूज्यनीय मानले जाते. महादेव गळ्यात नाग धारण करतात. तर दुसरीकडे भगवान विष्णू शेषनागावर झोपतात. म्हणून हिंदू धर्मात नागपंचमीचा (Nag Panchami) दिवस नागांच्या पूजेला समर्पित केले जाते. नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. भारतीय हिंदू धर्मात नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून त्यांना दूध पाजले (Milk feeding to Snake) जाते. असे केल्याने नागदेवता आपल्या कुटुंबाला कधीही हानी पोहोचवत नाही, अशी धारणा आहे. पण याविषयी ई टीव्ही भारतने आढावा घेतला असता, सर्पप्रेमी - पशु प्रेमी भरत छेडा यांनी बोलताना माहिती दिली. नागपंचमीला नागाला किंवा सापाला दूध पाजणे अनैसर्गिक आहे. दूध पाजल्याने नागाचे आयुष्य धोक्यात (Feeding milk to snake threatens its life) येऊ शकते, अशी माहिती दिली. यंदा नागपंचमी 2 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. यंदाच्या नागपंचमीला प्रतिकात्मक नागाची पूजा करावी; त्याला दूध पाजू नये, असेही आवाहन सर्पप्रेमी भरत छेडा यांनी केले आहे.
नागपंचमी विषयी आख्यायिका : नागाला दूध प्यायला देण्याच्या परंपरेचा संबंध, पांडवांचे वंशज आणि कलियुगाचा पहिला राजा परीक्षित यांच्या कथेशी जोडला जातो. तक्षक सापाच्या दंशाने राजा परीक्षितचा मृत्यू झाला होता. वडिलांच्या मृत्यू नंतर परीक्षितचा मुलगा जन्मेजयने हा संकल्प केला होता की, पृथ्वी वरील सर्व सापांना संपवून टाकेल. त्यासाठी त्याने एका यज्ञाचे आयोजन केले होते. यज्ञाच्या प्रभावामुळे जगातील सर्व साप यज्ञकुंडात येऊन पडले होते. भयभीत होऊन तक्षक नाग आपला जीव वाचवण्यासाठी इंद्राच्या सिंहासनावर जाऊन लपून बसला होता. यादरम्यान यज्ञाच्या प्रभावामुळे इंद्राचे सिंहासन हवनकुंडाच्या दिशेने ओढले जाऊ लागले होते. यावेळी ऋषींनी आणि देवतांनी राजा जन्मेजयला विनंती केली की, जर त्याने जगभरातील सर्व सापांना मारले; तर निसर्गाचा समतोल बिघडून जाईल. राजा जन्मेजयने देवांची विनंती मान्य केली आणि तक्षक सापाला क्षमा केले. यांनातर यज्ञाकुंडात जळालेल्या नागांना बरे करण्यासाठी, आस्तिक मुनींनी त्या नागांना गाईच्या दुधाने अंघोळ घातली. यामुळे नागांचा अंतदाह शांत झाला.
नागपंचमीला दूध पाजण्याची परंपरा : आस्तिक मुनींनी सापांना गाईच्या दुधाने अंघोळ केली. तो दिवस श्रावण महिन्याचा पाचवा दिवस होता. तेव्हापासून श्रावण महिन्यात पंचमीचा दिवस सापांना समर्पित करण्यात आला. यासोबतच नागाला दुधाने अंघोळ करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी नागाचे संरक्षण करण्याचा संदेश दिला जातो. पण अनेक हिंदू भाविकांनी, नागाची दुधाने अंघोळ घालण्याऐवजी दूध पाजण्याची परंपरा सुरू केली.
नागाला दूध पाजणे म्हणजे त्यांचे आयुष्य धोक्यात घालणे : वैज्ञानिक दृष्ट्या नागाला दूध देणे चुकीचे मानले जाते. दूध पाजल्याने त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याबाबत अनेक वैज्ञानिकांनी आणि सर्प मित्रांनी वेळोवेळी जनजागृती केली आहे. सरपटणारे प्राणी दूध पचवू शकत नाही. दूध पिल्याने सापाच्या पोटात त्याच्या आतड्यात इन्फेक्शन होऊन; त्याचा मृत्यू होतो, अशी माहिती समोर आली आहे.
सर्पमित्रांनी साप पकडून पैसे मागणे गुन्हा : सद्यस्थितीत अनेक सर्पमित्रांना साप आढळल्यावर संपर्क केला जातो. साप पकडून हे सर्पमित्र, नागरिकांना पैसे मागू लागले आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे, बेकायदेशीर आहे. असे कोणी केल्यास आमच्याकडे लेखी तक्रार द्या. आम्ही वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करू, अशी माहिती भरत छेडा यांनी दिली.
हेही वाचा : Big Decision On Dahihandi : दहीहंडीच्या पार्श्वभुमीवर शिंदे सरकारचा मोठा निर्णय