सोलापूर - शाळेत शिपाई या पदावर नोकरी लावतो अशी थाप मारून 6 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या बाप-लेकाला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे. सुहास रेवण दलाल (रा. उमा नगरी, मुरारजी पेठ, सोलापूर) शुभम सुहास दलाल (रा. उमा नगरी, मुरारजी पेठ, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फसवणूक झालेली तक्रारदार महिला सिंधुबाई पाडवी(वय 58 रा,उमा नगरी, मुरारजी पेठ) यांनी 17 मार्च 2020 ला तक्रार दिली होती.
सिंधुबाई पाडवी यांची मुलगी गीता हिची सासरची घरची परिस्थिती हलाकीची आहे. तिला नोकरी लावून तिची परिस्थिती सुधारावी, असा सिंधुबाई यांचा प्रयत्न होता. 2018 मध्ये याचाच फायदा गल्लीत राहणाऱ्या सुहास दलाल, शुभम दलाल, व अंजली दलाल यांनी उचलला. अक्कलकोट येथील एका शाळेत मागासवर्गीय कोट्यातून शिपाई या पदावर नोकरी लावतो अशी थाप मारून 6 लाख 40 हजार रुपये मागितले. सिंधुबाई पाडवी यांनी दलाल कुटुंबीयांवर विश्वास ठेवत पैसे देण्याची तयारी दाखवली. मुलगा अजय पाडवी व मोठी मुलगी गीताला या दोघांना नोकरी लावण्याचे कबूल करत दलाल यांनी पैसे घेतले.
सिंधुबाई पाडवी यांनी सुहास दलाल, शुभम दलाल, व अंजली दलाल यांना एका स्टॅम्प पेपरवर लेखी लिहून देत 6 लाख 40 हजार रुपये 29 मे 2018 रोजी दिले होते. परंतु, कसलीही नोकरी न लावता गेल्या दोन वर्षा पासून तिन्ही संशयित आरोपी टाळाटाळ करीत होते. शेवटी सिंधुबाई यांनी 17 मार्च 2020ला फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित आरोपींचा शोध घेत बुधवारी सायंकाळी 2 सप्टेंबर 2020 रोजी सुहास दलाल व शुभम दलाल यांना अटक केली आहे. हवालदार सुनील चौधरी अधिक तपास करत आहेत.