सांगोला तालुका (सोलापूर) : सांगोला तालुक्यात मुलाला कोरोनाची लागण झाल्याने वयोवृद्ध वडिलांनी घराजवळील जनावरांच्या निवाऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सांगोला तालुक्यातील बामनी गावात शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी ही घटना घडली.
दिनांक 11 ऑगस्ट रोजी आत्महत्या केलेल्या व्यक्ती्च्या मुलाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर आरोग्य विभागाचे कर्मचारी घरातील सदस्यांची कोरोना चाचणी करायला येणार असल्याची माहिती मुलाच्या वडीलांना मिळाली होती. त्यामुळे मुलाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे आता आपलाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येणार, या भीतीपोटी सदर व्यक्तीने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घराशेजारील जनावरांच्या पत्राशेडमधे गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा - 'सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुढील कार्यवाही'
सकाळी सुन जनावरांच्या निवाऱ्याची जागा स्वच्छ करण्यासाठी गेली असता, त्यांना त्यांच्या सासऱ्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरडा करून घरातील सर्वांना जागे केले. यानंतर सदर व्यक्तीला उपचारासाठी सांगोला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.