सोलापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जिल्ह्यातील नुकसानीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द, रामपूर आणि बोरी उमरगे येथे पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी अतिवृष्टी आणि पुरामध्ये नुकसान झालेल्या ग्रामस्थांना तत्काळ मदत म्हणून धनादेशांचे वाटप केले. मात्र, नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असताना, १० ते १५ हजारांचे धनादेश मिळाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळी ११ वाजताच्या दरम्यान मुख्यमंत्री सांगवी खुर्द येथे पोहचले. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची त्यांची विचारपूस केली. यानंतर ११ ग्रामस्थांना तत्काळ मदत म्हणून धनादेशांचे वाटप करण्यात आले. काहींना २५ हजार तर काही ग्रामस्थांना ५ ते १० हजारांचे धनादेश देण्यात आले. यानंतर त्यांनी बोरी नदीवरील पुलावर जाऊन पाहणी केली.
सांगवी येथील स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांनी रामपूर येथील ग्रामस्थांची भेट घेतली. सरकार तुमच्या पाठीशी आहे, धीर सोडू नका, असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला. यानंतर त्यांनी बोरी उमरगे या ठिकाणी जाऊन पाहणी केली. पूरग्रस्तांना आधार देऊ, अभ्यास करणार नाही, तत्काळ मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
नुकसान लाखांचो आणि धनादेशात फक्त हजार -
सांगवी बुद्रुक आणि सांगवी खुर्द या गावाला बोरी नदीच्या पुराचा मोठा फटका बसला आहे. यात ११ घरे वाहून गेली तर ११३ घरांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. पशुधनाचीही मोठी हानी झाली आहे. रामपूर येथील एका शेतकऱ्याने २४ तास झाडावर बसून काढले. त्यांची बैल जोड देखील पाण्यात वाहून गेली. या नुकसानी पोटी त्यांना २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी 'मुख्यमंत्र्यांनी विचारपूस केली, शेतातील जवळपास २ ते ३ लाखांची तूर पुरात वाहून गेलीए, पण मदत मिळालीये 25 हजारांची, यात काय होणार?' असा सवाल ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा - राज्यावर मोठं आर्थिक संकट; मोठ्या प्रमाणावर कर्ज घेण्याची गरज