सोलापूर - बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी कांद्याच्या दराचा फुगवटा करू नये, म्हणत शेतकऱ्यांनी बाजार समितीवर राग व्यक्त केला. सोमवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15 हजार रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकला गेल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. त्यामुळे कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. वास्तविक पाहता 15 हजार रुपये हा दर फक्त काही मोजक्याच शेतकऱ्यांना मिळालेला असताना दराचा बाऊ केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा - हौसेला मोल नसते; शेतकऱ्याने आपल्या नवरी मुलीची हेलिकॉप्टरमधून केली पाठवणी
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याला सरासरी 6 हजार रुपये दर मिळाला आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल 15 हजार रुपये दर मिळाल्याच्या बातम्या सर्व माध्यमातून प्रदर्शित झाल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याच्या दराकडे लागले होते. यावर सोलापुरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनीदेखील दराच्या संदर्भात बैठक घेऊन अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला आहे.
हेही वाचा - उजनी जलाशयातून मच्छिमारांनी पकडली दोनशे किलोची मगर
कांद्याला 15 हजार रुपये दर मिळाला असला, तरी फक्त 7 टन कांद्याला हा दर मिळाला असून उर्वरित 10 टन कांद्याला सर्वसाधारणपणे 4 हजार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच आज मंगळवारी देखील बाजार समितीमध्ये 5 हजार ते 6 हजार एवढाच सरासरी दर मिळाला आहे. मात्र, माध्यमातून कांद्याला मोठ्या प्रमाणावर दर मिळत असल्याचे चित्र रंगविण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी देखील कांद्याचा दर सांगत असताना उच्चतम दर न सांगता सर्वसाधारण दर सांगावा, असे आवाहनही शेतकऱ्यांनी केले.