सोलापूर - मंगळवेढा येथील संजय अवताडे यांच्या घरी वास्तूशांतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी सत्यनारायणची पूजा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रम असल्याने घरी पाहुण्यांची गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत चाळीस एकर बागायतदाराने घरी आलेल्या पाहुण्यांच्या बॅगेतून 859 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या चोरीचा छडा लावला आहे. सर्वेश्वर दामू शेजाळ (वय 35 वर्षे, रा. गोनेवाडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) या संशयितास पोलिसांनी अटक केले आहे.
गर्दीचा फायदा घेत बॅगेतील सोने चांदी लंपास
10 जानेवारी, 2021 रोजी मंगळवेढा येथील खंडोबा गल्लीत राहणाऱ्या संजय महादेव अवताडे यांच्या घरी वास्तूशांतीचे कार्यक्रम होते. या कार्यक्रमाला विनायक माधवराव यादव (वय 41 वर्षे, रा. मारापूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) हे देखील आले होते. त्यांच्या जवळ एक बॅग होती. बॅगेत त्यांनी 859 ग्रॅम सोन्याचांदीचे दागिने आणले होते. सर्वेश्वर शेजाळ हा त्या बॅगेवर लक्ष ठेवून होता. विनायक यादव यांनी गर्दीमध्ये व विश्वासाने बॅग ठेवली व हॉलमध्ये गेले. त्याचवेळी संशयीताने बॅगेतील सोने लंपास केले व तेथून पळ काढला. काही वेळाने विनायक यादव यांनी बॅग तपासली असता. त्यांना लक्षात आले की बॅगेतील ऐवज चोरीला गेला आहे. याबाबत ताबडतोब मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास हाती घेतला होता.
सीसीटीव्हीच्या आधारे चोरीचा छडा
स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास हाती घेतला. घरातील सीसीटीव्हीचा तपास केला. त्यामध्ये अनोळखी संशयीत व्यक्ती हा वावरत असल्याचे दिसून आले. त्या संशयिताचा शोध घेतला असता, ती व्यक्ती मंगळवेढा येथील गोनेवाडी येथील सर्वेश्वर शेजाळ असल्याची माहिती समोर आले. मंगळवेढा येथील एका घरात भाड्याने वास्तव्यास असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने प्राप्त केली. त्यास दामाजी चौक येथून ताब्यात घेतले.
चोरीचे सोने शेताच्या बांधावर पुरून ठेवले होते
सर्वेश्वर शेजाळ याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. सुरुवातीला त्याने उडवा उडावीची उत्तरे दिली. त्यांनतर त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारले असता त्याने चोरी केलेले सर्व सोने गोनेवाडी येथील शेतात पुरून ठेवल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेतातील बांधावर जाऊन सर्व सोने हस्तगत केले.