सोलापूर - कोरोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शेतीव्यवसायाला मोठा फटका बसला आहे. जिंती येथील शेतकरी सदानंद देशपांडे यांनी बावीस एकर क्षेत्रावर पुर्णपणे केमिकल विरहित भाजीपाल्याची लागवड केली होती. मात्र, कोरोनामुळे ही भाजीपाल्याची शेती तोट्यात गेली असून उत्पादित माल जनावरांना घालावा लागत आहे.
जिंती येथे सदानंद देशपांडे यांनी त्यांच्या शेतात पंचेचाळीस लाख रुपये खर्च करुन इंडियन व विदेशी भाजीपाल्याची जानेवारी महिन्यात लागवड केली होती. या प्रकारच्या शेतीमध्ये उत्पादित झालेला भाजीपाला पुर्णपणे केमिकल विरहित असतो. हा भाजीपाला मॉल, हॉटेल आणि पुणे येथील बाजारपेठेत विकण्याचे शेतकऱ्याचे नियोजन होते. या भाज्यांची तोडणी चार मार्चला सुरू झाली होती. परंतु, अचानक कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे भाजीपाला शेतीचे नियोजन कोलमडले आणि पुण्यात ग्राहक नसल्यामुळे भाजीपाला जनावरांना घालण्याची वेळ आली आहे.
यावर बोलतना सदानंद देशपांडे म्हणाले, आम्ही आधुनिक पद्धतीने २२ एकर क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड केली. परंतु, कोरोनामुळे एका हंगामाचे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आम्हाला हा व्यावसाय बंद ठेवावा लागणार आहे. या शेतीकामातून स्थानिक मजुरांना रोजगार निर्मितीही झाली होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण देश बंद करण्यात आला. मात्र, जगाचा पोशिंदा शेती व्यवसाय प्रामाणिकपणे करत होता. या शेतकऱ्याला आधार देणे आता सर्वांचेच काम आहे.