पंढरपूर (सोलापूर) - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सोमवार, 21 सप्टेंबरला संपूर्ण जिल्हा बंद ठेवून सरकारचा निषेध केला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. सर्व उपाययोजना करून मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. सोमवारी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहे. या बंदला सर्वच राजकीय पक्ष, व्यापारी संघटना तसेच समाजातील विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिल्याची माहिती माळशिरस सकल मराठा समाजाचे समन्वयक धनाजी सकाळकर यांनी दिला आहे. माळशिरस सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी होणाऱ्या आंदोलनासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी मराठा समाजातील नेते उपस्थित होते. राज्य सरकार विरोधी जोरदार घोषणा दिल्या.
सोमवारी बंद दिवशी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आसूड आंदोलन केले जाणार आहे. या सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन मराठा समाजासाठी त्यांच्या सर्वोच्च नेत्यांपुढे आरक्षण कसे पूर्ववत करता येईल यासाठी दबाव आणण्याचे काम करावे, अशी विनंती करण्यात येणार आहे. सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ही स्थगिती म्हणजे मराठा समाजाचा एकप्रकारे अपमान करण्याचाच प्रयत्न सुरू आहे. पहिल्यांदा दिलेल्या आरक्षणामुळे अनेक मुलांना विविध खात्यांत नोकर्या मिळाल्या आहेत. तसेच, शैक्षणिक सवलतीही मिळाल्या आहेत.
या बंद काळात एसटी बसेसच्या तोडफोडीसारखे प्रकार घडू शकतात. त्यामुळे एसटी बसेसच्या तोडफोडीसारखे प्रकार होवू नयेत त्यामुळे कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.