सोलापूर - हैद्राबादवरून चॉकलेट भरून पुण्याला निघालेल्या आयशर टेम्पोने टोल भरण्यासाठी थांबलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. या अपघातात आयशर मधील प्रवासी महिलेसह एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सावळेश्वर टोल नाक्यावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर (एम १५ ईजी ४३०३) हैद्राबादवरून चॉकलेट भरून पुण्याकडे निघाला होता. सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या सावळेश्वर टोल नाक्यावर टोल देण्यासाठी थांबलेल्या ट्रकला आयशरने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला.
प्रयागाबाई सुरवसे (वय ७५) आणि मारुती बलसुरे असे मृतांची नावे आहेत. दोघेही लातूर जिल्ह्यातील बामणी गावाचे रहिवाशी असल्याचे समजते. या अपघातात चालक सचिन जाधव गंभीर जखमी झाला असून मोहोळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण पोलीस आतापर्यंत २५ ब्लॅक स्पॉटवर अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण आता तर थेट टोल नाक्यावर अपघात झाल्याने, रस्ते सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया सोलापूरकरांमधून व्यक्त होत आहे.