सोलापूर (पंढरपूर) - कोरोनाच्या संकटामुळे यंदाची आषाढी वारी होणार नाही. त्यामुळे पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेश बंदी केली आहे. तरी काही वारकरी मंडळी छुप्या मार्गाने पंढरपुरात येण्याचा प्रयत्न करत आहे. अशा मार्गाने येणाऱ्या वारकऱ्यांवर ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी दिली.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारके पंढरपुरात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतूल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे उपस्थित होते.
पंढरपुरात आषाढी यात्रा होणार नाही, अशी भूमिका शासनाने आधीच घेतली आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी सहभागी होऊ नये. याबाबत दिंडी प्रमुखानांही सूचना देण्यात आल्या आहेत. 25 जूनपासून पंढरीत 1 हजार 500 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामधे अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड असा फौजफटा असणार आहे. कर्मचाऱ्यांना कोरोनाची काळजी घेण्यासाठी सर्व साहित्यांचे कीट पुरवले जाणार आहे. दररोज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची थर्मल स्क्रीनिंग होणार आहे.
विठ्ठल मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त असणार आहे. पंढरपूर तालुक्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. पंढरपुरातील 5 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदीत पंढरपुरात कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. 25 जून ते 5 जुलैपर्यंत ही नाकाबंदी असणार आहे. प्रशासनकडून वारकऱ्यांनी घरीच विठ्ठल- रुक्मिणीची पूजा करण्याचे आवाहन केले आहे.