माढा(सोलापूर)- अधिकाऱ्यांचे गाव अशी ख्याती असलेल्या उपळाई बुद्रुक गावात आणखी एका अधिकाऱ्याची भर पडली आहे. एम.बी.बी.एसचे शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत झाल्यानंतरही त्या डॉक्टर मुलीने प्रशासकीय(आयएएस) सेवेत दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
बोकडदरवाडी(उपळाई बु) अश्विनी तानाजी वाकडे असं त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या डॉक्टर मुलीचे नाव आहे. तिने
२०० व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत हे यश मिळवले आहे. तिच्या या यशानंतर गावात ग्रामस्थांसह नातेवाईकांनी पेढे फटाके फोडत दिवाळी साजरी केली.
अश्विनीचे मोठे बंधू अमरदीप वाकडे हे तहसीलदार तर म्हणुन कराड येथे कार्यरत आहेत. मोठी बहीण मीनाक्षी वाकडे लातूर येथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या दोघापेक्षा ही "तु मोठी सायबिन झाली"पाहिजे हे आई वडिलांचे स्वप्न अश्विनीने सत्यात उतरविल्याने आई वडिलांना निकाल समजताच त्यांच्या डोळ्यात आंनदाश्रु तरळले. अश्निनीचा लहान भाऊ अमित वाकडे यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तो देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे.
अश्विनीचे वडील निवृत्त पोलीस कर्मचारी असून आई कल्पना शेतात काळ्या आईची सेवा करतात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत माढा तालुक्यातील बोकडदरवाडी (उपळाई बुद्रूक) येथील अश्विनी तानाजी वाकडे यांनी आय.ए.एस अधिकारी होण्याचा मान पटकावला.
अश्विनी यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद घेरडी (ता.सांगोला) माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर (ता. मोहोळ) अकरावी व बारावीचे शिक्षण शिवाजी कॉलेज बार्शी येथे एमबीबीएसचे शिक्षण पुणे येथे झाले.चार वर्षापासुन यूपीएससीचा अभ्यास सुरु होता. पंरतु दोन वेळा पदरी अपयशच आले. अपयश पचवत त्याच उम्मेदीने अश्निनीने तिसऱ्या प्रयत्नात यशोशिखर अखेर पार केले.
अश्निनीने सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी म्हणुन देखील काम केले. पंरतु वैद्यकीय क्षेत्रापेक्षा प्रशासकीय सेवेत येण्याची जिद्द बाळगली आणी ती जिद्द पूर्णही करून दाखवली आहे.
सोशल माध्यमावर गुरफटु नका-
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना अश्निनीने मोबाईलचा वापर हा युपीएससी परीक्षेच्या अभ्यास मालिका, दररोजचे वर्तमानपत्र वाचण्यासाठी केला. चार वर्षात एकदाही मी सोशल माध्यमाचा वापर केला नाही. तरुण वर्ग सोशल माध्यमावर गुरफटत असल्याने त्यांचे ध्येय विचलित होत असल्याचे अश्निनीने बोलताना सांगितले.
तसेच आई वडिलांनी मुलगी आहे म्हणून तिला मर्यादित शिक्षण न देता, तिच्या ध्येयाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील मुला मुलींनी देखील मोबाईलचा सदुपयोग करावा. सोशल माध्यमात गुरफटु नये. आई वडिलांच्या कष्टाचे चीज करावे. माझ्यावर जी जबाबदारी मला सोपवली जाईल ती सक्षमपणे पार पडणार असल्याचेही अश्निनी वाकडे यांनी सांगितले.
आम्हांला आभाळ ठेंगण वाटु लागले
अश्विनीने दोन्ही मोठ्या भावंडापेक्षा मोठे पद मिळवावे, असे स्वप्न आम्ही बाळगून होतो. ते अश्विनीने सत्यात उतरवले. आमच्या कष्टाचे चिज केले. त्यामुळे आम्हांला आभाळ ठेंगण वाटु लागले असल्याची प्रतिक्रिया अश्विनीचे आईवडील-तानाजी वाकडे आणि कल्पना वाकडे यांनी दिली.