सोलापूर - उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ( Solapur Health Department ) सात बालकांना पोलिओ लस ऐवजी कावीळ लस ( Dose of Jaundice Given Instead of Polio to Babies ) दिल्याने सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत संताप व्यक्त केला जात असून या सर्व प्रकरणाची सीईओ दिलीप स्वामी यांनी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहीम सुरू आहे. मंगळवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी गावातील आरोग्य उपकेंद्रवरील आरोग्यसेविका शिंदे यांनी पोलिओ ऐवजी बालकांना काविळीची लस दिली. संबंधित बालकांना यापूर्वीच काविळीची लस देण्यात आली होती. दुसऱ्यांदा लस दिली गेल्याने बालकांना त्रास होऊ लागला. लसीची रिएक्शन झाल्याने, एक बाळ बेशुद्ध पडले होते. तीन बाळांना ताप आला असून एकूण सात बालकांना या ठिकाणी लसीकरण झाले होते.नागरिकांनी जेव्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा सातही बालकांना ताबडतोब जवळच्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, अशी माहिती उत्तर सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शेगार यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले चौकशीचे आदेश -
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना मंगळवारी रात्री उशिरा याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्वरित त्यांनी सर्व प्रकरणाची चौकशी केली. डॉक्टरांशी चर्चा केली. सर्व बालके सुखरूप असल्याचं त्यांनी सांगत या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. दरम्यान, सीईओ स्वामी यांनी या प्रकरणाची चौकशी मेडिकल कॉलेजच्या समितीकडून करणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून न्याय मिळेल का?
दोन वर्षांपूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगावमध्ये लसीकरणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात संबंधित आरोग्य सेविकेवर कारवाई झाली होती मात्र पुन्हा तिला कामावर घेण्यात आले. मयत झालेल्या बालकाच्या आई-वडिलांना कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. या शासकीय मदतीसाठी ते कायम जिल्हा परिषदेला चक्करा मारतात मात्र कुणीही दखल घेत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होणार, हे खरंय का?