सोलापूर- आषाढी वारीनंतर अस्वच्छ झालेले चंद्रभागेचे वाळवंट आणि वाखरी येथील पालखी तळाची आज जिल्हा प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांच्यासह दोन हजार कर्मचाऱ्यांनी मिळून स्वच्छता अभियान राबविले.
पौर्णिमेला आषाढी यात्रेची सांगता झाली. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने शहरात स्वच्छता करण्यात आली. चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, विठ्ठल मंदिर परिसर, वाखरी पालखी तळ या बरोबरच शहरातील अनेक भागात स्वच्छता केली. तीन तासांच्या स्वच्छता अभियानात सुमारे पाच टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. दरवर्षी आषाढी वारी निमित्त लाखो वारकरी आणि विठ्ठल भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. आषाढी वारी नंतर शहरात घाणीचे साम्राज्य होत असते. याचा ताण सफाई कर्मचाऱ्यांवर येत असतो. स्वत: जिल्हाधिकारी आणि कर्मच्याऱ्यांनी मिळून हे स्वच्छता अभियान राबविले.