सोलापूर - सोलापूर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज ग्रामीण भागात १८८९ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली. तर ४५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान काही शहरात मात्र कोरोनाची ही दुसरी लाट कमी होत असल्याचे चित्र आहे. शनिवारी शहरात १२५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहर आणि ग्रामीण असे एकूण २०१४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर एकूण ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरात १२५ जणांना लागण, ९ मृत्यू आणि १५४ जण कोरोना मुक्त
एकीकडे सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर, शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव आता हळूहळू कमी होत आहे. शनिवारी सोलापूर शहरात १८७२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १२५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये ७६ पुरुष तर ४९ स्त्रिया आहेत. दरम्यान सोलापूर शहरात विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या ९ पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ पुरुष आणि २ स्त्रियांचा समावेश आहे. शनिवारी सोलापूर शहरात १५४ रुग्णांनी कोरोना आजारावर मात केली आहे. सध्या सोलापूर शहरात १७३५ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोलापूर ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच, 1889 रुग्णांची भर
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी प्रयत्न करत आहेत. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांना यामध्ये यश आलेले नाही. कारण सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज हजारच्या संख्येने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. आज शनिवारी ग्रामीण भागात ६५२९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १८८९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये ११५६ पुरुष आणि ७३३ स्त्रिया आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या ४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २८ पुरुष आणि १७ स्त्रिया आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ४७८ रुग्ण आढळले आहेत. तर माढा येथे ३१४ रुग्ण, माळशिरस २५९ रुग्ण आढळले आहेत.
हेही वाचा- सोलापूरमधील माळशिरस पंढरपूर, करमाळा ठरतोय कोरोना हॉटस्पॉट