सोलापूर - माढा पंचायत समितीच्या सभापती पदावरून पंचायत समिती सदस्य धनराज रमेश शिंदे यांना पुन्हा एकदा हुलकावणी मिळाली आहे. त्यांनी सभापती पदाच्या निवडीच्या कार्यक्रमाला दांडी मारली. सभापती पद या वेळेलाही न मिळाल्याने ते निश्चितच नाराज झाले असल्याची माहिती शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - सोलापूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला भाजपची धोबीपछाड
माढा पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होते. मंगळवारी पार पडलेल्या सभापती पदाच्या निवडीच्या कार्यक्रमात बेंबळे पंचायत समिती गणातून ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गातून निवडूण आलेले व गतवेळेस सर्वसाधारण जागेवर सभापती पदावर विराजमान झालेले आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र विक्रमसिंह शिंदे यांना पुन्हा एकदा सभापती पदाची संधी देण्यात आली. त्यामुळे ते दुसऱ्यांदा सभापती झाले आहेत. तर, अडीच वर्ष उपसभापती पदी राहिलेले बाळासाहेब शिंदे यांच्या ऐवजी नव्याने धनाजी जवळंगे याना संधी दिली आहे.
मंगळवारी सभापती पदाच्या निवडीच्या कार्यक्रमाला व्यक्तिक कारणामुळे उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे तो रजेचा अर्ज धनराज शिंदे यांनी आपल्या स्वीय सहायकामार्फत अध्यासी अधिकारी यांच्याकडे सादर केला होता.
लऊळ पंचायत समिती गणातून विजयी झालेले धनराज शिंदे यांना सर्वसाधारण सभापती पदाच्या आरक्षित जागेवर बसवले जाईल, अशी शक्यता होती. मात्र, ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गातून निवडूण आलेले आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र विक्रमसिंह शिंदे यांना सभापती पदाची खुर्ची दिली. त्यामुळे या वेळेस ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या जागेवर धनराज शिंदे यांना सभापती पदाची लॉटरी लागण्याची राजकीय चिन्हे वर्तवली जात होती. मात्र, त्यांना या वेळेस देखील सभापती पदापासून दूर ठेवले आहे.
हेही वाचा - जिल्हा परिषदेत भाजपच्या समविचारीची महाविकास आघाडीला धोबीपछाड
विक्रम शिंदे यांच्याबरोबरच धनराज यांच्याकडे देखील ओबीसी प्रमाणपत्र होते. सभापती पदाच्या शर्यतीत या दोघांसह ओबीसी प्रवर्गातून निवडूण आलेले प्रज्ञा कुटे, सुजाता राऊत, धनाजी जवळगे हे होते. मात्र, विक्रम शिंदे यांनी पुन्हा सभापती पद काबीज केले आहे. धनराज शिंदेंच्या समर्थकांनी देखील आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
पुतण्याची नाराजी हटवणार?
पंचायत समितीचे तिकीट सहजासहजी मिळाले नव्हते. ते मिळवण्यासाठी धनराज शिंदे यांना संघर्ष करावा लागला होता. हे सर्वांना ज्ञात आहेच. सभापती पदामुळे नाराज होऊन नॉट रिचेबल राहिलेल्या धनराज यांची नाखूशी कशी काढली जाईल? आपल्या पुतण्याचे नाराजसत्र आमदार शिंदे कसे हटवणार? याकडे सबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे.
धनराज शिंदे दिवसभर नॉट रिचेबल -
धनराज शिंदे यांच्याशी बातचीत करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन दिवसभर नॉट रिचेबल होता. निवडीवेळी अनुपस्थित राहिलेले धनराज शिंदे हे उजनी जलाशयात आपल्या निकटवर्तींयांसोबत बोटींग करत असल्याची माहिती मिळत आहे.