पंढरपूर (सोलापूर) - मराठा आरक्षणावरून राज्यात मराठा समाज आक्रमक आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून दोन दिवसीय अधिवेशन घेण्याची तयारी करण्यात येत आहे. त्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत ही कायदा संमत करावा, अशी मागणी सकल धनगर आरक्षण कृती समितीने करण्यात आली आहे. असे न झाल्यास आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपुरात येणार आहेत. धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकारने मंजूर न केल्यास मुख्यमंत्र्यांना पंढपुरात येऊ देणार नाही, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य आदित्य फत्तेपूरकर यांनी दिला आहे. पंढरपूर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वाड्यामध्ये धनगर आरक्षण कृती समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्न मार्गी लावा...
सर्वोच्च न्यायालयातून राज्यातील मराठा आरक्षण रद्द करण्यात आले होते. त्यानंतर मराठा समाजाने आक्रमक होत. 16 जूनपासून मराठा आरक्षणा संदर्भात आंदोलनाची हाक दिली आहे. त्याचबरोबर आता राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील धनगर आरक्षण समितीकडून धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत विशेष अधिवेशनामध्ये ठराव मांडून तो संमत करावा, अशी मागणी धनगर आरक्षण समितीकडून करण्यात आली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आषाढी एकादशी सोहळ्यातील विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे 20 जुलैला एकादशी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपुरात येणार आहेत. ज्याप्रमाणे मराठा समाजास आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवत आहे व कायदा मंजूर करून घेत आहे. त्याचप्रमाणे धनगर आरक्षण कायदा मंजूर करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. असे न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशी सोहळ्यासाठी येऊ न देण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
हेही वाचा - पंढरपुरात आमदार गोपीचंद पडळकर यांची संवाद यात्रा सुरू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका