सोलापूर - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाषणाला सुरुवात करताच धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भाषणापासून रोखले. विद्यापीठाला नाव देण्याच्या संदर्भात सुभाष देशमुख यांनी कोणतीही मदत केलेली नाही. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी विद्यापीठाला नाव मिळाल्यानंतर श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असे म्हणत धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला आणि सुभाष देशमुख यांना भाषण करण्यापासून रोखले. आक्रमक झालेल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांसमोर सुभाष देशमुख यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले.
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने मोठे आंदोलन उभे करण्यात आले होते. सर्वांच्या सहकार्यातूनच विद्यापीठाला पुण्यश्लोक आहिल्यादेवींचे नाव देण्यात असल्याचा उल्लेख सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी करताच धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत सुभाष देशमुख यांना भाषणापासून रोखले. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नाव देऊन त्याचा नामांतर सोहळा आज सोलापूर विद्यापीठात पार पडला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख होते. ते भाषणाला उठल्यानंतर भाजप सरकारने धनगर समाजासाठी काय केले, हे सांगितले. तसेच सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देत असताना सर्वांच्या सहकार्यातून हे नाव मिळाल्याचे सांगितले. यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुभाष देशमुख यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत देशमुखांना भाषण पासून रोखले. ज्यावेळी विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा विषय होता. त्यावेळी सुभाष देशमुख यांना पत्र मागण्यासाठी गेले असता सुभाष देशमुख यांनी पत्र दिले नसल्याचा उल्लेख करत देशमुख यांनी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा आरोप धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी केला . प्रचंड गोंधळ घालत सुभाष देशमुख यांना भाषण यापासून रोखले.