सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील झालेल्या फुटीनंतर शरद पवार यांचा सोलापूर जिल्ह्यातील हा पहिलाच दौरा आहे. सोलापूर येथील कार्यक्रम झाल्यानंतर सांगोलाकडे जाताना मंगळवेढा येथे शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे, असे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले आहे. मंगळवेढा तालुका हा शरद पवार यांच्या विचारांना मानणारा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शरद पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते नेतेमंडळी यांनी जोरदार तयारी केली आहे.
जंगी तयारी : खासदार शरद पवार यांचे दुपारी माचाणूर चौक येथे स्वागत होणार आहे. तिथून ही रॅली निघणार आहे. तसेच मंगळवेढा शहरालगत पहिल्या ब्रीजपासून बोरळ नाक्यापासून दामाजी चौकाकडे रवाना होऊन दामाजी चौक येथे आगमन होणार आहे. शरद पवार यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अभिजीत पाटील यांनी मंगळवेढा येथे जंगी तयारी केल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंतराव पाटील, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी सभापती आमदार रामराजे निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील उपस्थित राहणार आहेत. न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे हा कार्यक्रम होणार आहे.
शरद पवारांचा दुसरा दौरा : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार हे पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या गटाचा एकही आमदार सध्या नाही. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट व अजित पवार गट असे दोन गट झाले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जे राष्ट्रवादीचे आमदार होते, त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे दिसत आहे. एकंदरीतच या बदललेल्या सर्व राजकीय परिस्थितीवर शरद पवार हे नेमके काय बोलणार, याकडे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. 7 मे रोजी शरद पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर दोनच महिन्यांत पवार यांचा हा दुसरा दौरा आहे.
54 वर्ष सांगोला तालुक्याचे नेतृत्व : डॉ. गणपतराव देशमुख यांनी सांगोला मतदार संघातून अकरा वेळा निवडून येण्याचा विश्वविक्रम केला होता. आमदार गणपतराव देशमुख यांनी 54 वर्ष सांगोला तालुक्याचे नेतृत्व केले होते. 15 मार्च 1962 रोजी ते पहिल्यांदा आमदार झाले होते. 30 जून 2021 रोजी माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे उपचारदरम्यान निधन झाले होते. साधी राहणी आणि तत्त्वावर निष्ठा असणारा नेता, अशी गणपतराव देशमुख यांची ओळख होती.
हेही वाचा :
Sharad Pawar Ajit Pawar Meeting : काका-पुतण्यांचे चोरी चोरी चुपके-चुपके; नेमकं शिजतंय काय?