सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याबाबत शरद पवार या बॅट्समनने ७ दिवसांनी माघार घेतली अन् बारावा खेळाडू म्हणून मॅच पाहणे पसंद केले, त्याच दिवशी आम्ही माढा जिंकला आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा-कुर्डुवाडी येथे केला.
तिसऱ्या टप्प्यातील माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची सांगता आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेने झाली. त्यावेळी ते कुर्डुवाडी येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आमदार बबनराव शिंदे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह भाजप-सेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते.
राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची सांगता आज झाली. त्याअगोदर गेले १९ दिवस अनेक राजकीय घटना-घडामोडींनी सोलापूर जिल्ह्यातल्या ४ विधानसभा आणि सातारा जिल्ह्यातल्या २ विधानसभा मतदारसंघात प्रचाराची राळ उडाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यासाठी खुद्द पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांनी कमळ फुलवण्याचा चंग बांधला आहे. पण नागरी प्रश्नाच्या पलीकडे गटातटावर लढल्या गेलेल्या या निवडणुकीत मतदारराजा कुणाला कौल देतो, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. ते २३ मेला स्पष्ट होणार आहे.