सोलापूर- रात्रीच्या वेळी ट्रक अडवून लूटमार करणाऱ्या टोळीला पकडण्यात ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. पोलिसांनी आरोपींना अटक करुन, त्यांनी केलेला गुन्हा उघडकीस आणला आणि त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला. या टोळीमधील 3 आरोपींना अटक करुन पुढील तपासासाठी माळशिरस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तर आणखी आरोपींचा शोध सुरु आहे. सुरज वाघमोडे, विशाल दत्तात्रय पवार( दोघे रा. कळमबोली,ता. माळशिरस),रामभाऊ सतीश सुर्यवंशी( वय 23 रा. सूर्यवंशी वस्ती ,फडतरी, ता. माळशिरस),सतीश बापूराव रुपनवर ( वय 24 रा. लोणंद, ता माळशिरस) अशी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींची नावे आहेत.
31 जुलै ते 1 ऑगस्ट या दरम्यान कृष्णा बाबा साहेब सानप ( वय 27 रा. बीड ) व विजय हरी पाखरे हे दोघे दहा चाकी ट्रक (एमएच 11 एएल 0977)घेऊन जात असताना माळशिरस तालुक्यातील जळभावी घाटाच्या ठिकाणी पहाटे 3.55 च्या दरम्यान 7 आरोपींनी ट्रक अडवला.काचेवर दगड मारुन ट्रकचे नुकसान केले. ट्रक मध्ये बसलेले कृष्णा सानप व विजय पाखरे यांना दगडाने मारुन जखमी केले. तसेच चाकूचा धाक दाखवून 20 हजार रुपये रोख रक्कम व 28 हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन चोरुन घेऊन गेले. याबाबत 1 ऑगस्ट रोजी माळशिरस पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.
हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपास करण्याचा आदेश दिला होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसानी ट्रक लुटणाऱ्या टोळीचा तपास सुरू केला. मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांना नातेपुते येथे पेट्रोलिंग करताना एका गुप्तहेरामार्फत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार दहिगाव येथील एका चहा कॅन्टीन वर ट्रक लुटणाऱ्या टोळी मधील काही संशयित आरोपी थांबले होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताबडतोब दहिगाव येथे मोर्चा वळविला. तीन संशयित चहा पीत असताना आढळले.पोलिसांनी गराडा घालून विचारपूस सुरु केली असता सुरुवातीला उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे त्यांनी दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन दरोड्याची माहिती विचारली असता संशयित आरोपींनी 31 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान ट्रक लुटल्याची कबुली दिली व आणखी दोघा संशयित आरोपींची नावे सांगितली.
पोलिसांनी सर्व संशयित आरोपीना ताब्यात घेऊन एक मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली तीन दुचाकी वाहने असा एकूण 72 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.अधिक तपासासाठी या सर्व आरोपींना माळशिरस पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. आणखी आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक अरुण सावंत, सहायक पोलीस फौजदार शिवाजी घोळवे,पोलीस हवालदार नारायण गोळेकर,मनोहर माने,विजय कुमार भरले,मोहन मनसावाले,रवी माने, केशव पवार आदींनी केली.