सोलापूर - कुकडी प्रकल्पातून अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, हे वाहून जाणारे पाणी करमाळा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणात सोडावे, नाहीतर तीव्र आंदोलन करू, असा इशारा करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश नीळ यांनी दिला आहे.
सद्यपरिस्थितीत करमाळा तालुक्यात एकही मोठा पाऊस पडला नाही. त्यामुळे पूर्व भागातील शेतकरी अत्यंत मेटाकुटीला आलेला आहे. जनावरांना चारा नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. खरीप व रब्बीची पिके वाया गेले आहेत. अशा अनेक संकटांना तोंड देत जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पाचे ओव्हरफ्लो वाहून जाणारे पाणी व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून सीना कोळगाव धरणात सोडावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करणार, असा इशारा नीळ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजना सुरू आहे. त्या योजनेतून गुळसडी तलाव भरुन पुढे पांडे ओढा मधून म्हसेवाडी तलाव व सीना नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे व कुकडी प्रकल्पाचे ओव्हरफ्लो वाहून जाणारे पाणी वाया जाणार आहे. ते पाणी जातेगाव कॅनॉलमधून खडकी ओढामधून सीना नदीच्या पात्रात सोडण्यात यावे. अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.
कुकडी व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून वाहून जाणारे पाणी सीना कोळगाव धरणात न सोडल्यास रस्ता रोको, उपोषण अशा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.