सोलापूर - तिर्थक्षेत्र पंढरपूर हे दक्षिण काशी मानले जाते. आषाढी वारी हा विश्वातील भव्य दिव्य भक्ती सोहळा पंढरपूर येथे होत असतो. वर्षभरामध्ये किमान 50 लाखांपेक्षा जास्त भाविकांचे पंढरपूरला येणे होत असते. त्यामुळे पंढरपूरचा भारताच्या केंद्रीय पर्यटन सूचीमध्ये समावेश करावा आणि केंद्राकडून आषाढी वारी सोहळ्यासाठी प्रतिवर्षी 2 कोटींचा विकास निधी उपलब्ध करावा अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाकडून करण्यात आली आहे.
अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांच्या शिष्टमंडळाने आज सोलापूरचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांना निवेदन सादर करुन सविस्तरपणे चर्चा केली. केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतातील अनेक तीर्थ क्षेत्रांचा विकास झालेला आहे. त्यापध्दतीने पंढरपूर तीर्थ क्षेत्रांचाही विकास केंद्राकडून होण्यासाठी पर्यटन सूची मध्ये नोंद होणे खूपच गरजेचे आहे. आषाढी वारीला राज्य शासनाकडून दोन कोटींचा निधी नगरपरिषदेला मिळतो. तो वर्षभरासाठी वापरला जात असल्यामुळे आषाढी वारीला केंद्राकडून दरवर्षी आणखी दोन कोटी रूपये निधी उपलब्ध करून घेऊन भाविकांच्या सोयी सुविधांसाठी विशेष प्रयत्न करावेत अशी मागणीही याप्रसंगी करण्यात आली.