पंढरपूर (सोलापूर) - चैत्र शुद्ध कामदा एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात द्राक्ष आणि द्राक्ष वेलींच्या सहाय्याने मनमोहक सजावट करण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील संजय टिकोरे यांनी मंदिर समितीला या आकर्षक सजावटीसाठी द्राक्षे दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून वर्षभरामध्ये विविध सण व उत्सवानिमित्ताने श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक अशा आरास तयार केल्या जातात. कामदा एकादशी निमित्ताने द्राक्ष आणि द्राक्ष वेलींच्या सहाय्याने मनमोहक सजावट करण्यात आली आहे. या द्राक्ष सजावटीसाठी सातशे किलो द्राक्षांचा वापर करण्यात आला. द्राक्षवेली सजावटीमुळे विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप अधिकच खुलून दिसत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 5 एप्रिलपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले असले तरी मंदिरातील नित्योपचार नेहमीप्रमाणे सुरू आहेत. मात्र, श्री विठ्ठल रुक्मिणी चैत्र यात्रा रद्द करण्यात आली आहे. चैत्री यात्रेत भाविकांना पंढरपूरमध्ये घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच पंढरपुरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.