सोलापूर - राज्यातील तीन विद्यापीठांच्या परीक्षा प्रणालीवर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ या तिन्ही विद्यापीठाच्या परीक्षा प्रणाली वर सायबर हल्ला झाला आहे. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निर्देश दिले.
शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सोलापूर दौऱ्यावर होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठात त्यांनी बैठका घेत परीक्षेचा आढावा घेतला. राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांच्या ऑनलाईन परीक्षा होत आहेत. विद्यार्थी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षेला सामोरे जात आहेत. राज्यातील 7 लाख विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देत आहेत. तांत्रिक अडचणी मुळे किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा तात्काळ घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांनी दिली. परिक्षेवेळी येणाऱ्या अडचणी व त्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सामंत यांनी विद्यापीठ भेटी वेळी वॉर रूमची पाहणी केली. त्यानंतर परीक्षेचा आढावा घेतला. सर्व अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश विद्यापीठ प्रशासनास दिले. कोरोनामुळे काही पेपर पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. पण पुढच्या ऑनलाईन पेपर वेळी खबरदारी घेण्याच्या सूचना देखील दिल्या. याबाबत शंका असल्यास सायबर सेलकडे तक्रार नोंदवावी अशा ही सूचना देण्यात आल्या. कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी सामंत यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालिका डॉ. राजश्री देशपांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलेल्या महत्वाच्या बाबी -
* पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विद्यापीठ परिसरात पुतळा उभारणार, त्यासाठीचा खर्च राज्य शासन आणि विद्यापीठ संयुक्तरित्या करणार
* पुतळ्याचे भूमीपुजन याच महिन्यात करण्याचा राज्य शासनाचा मानस
* विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन सुरु करणार
* विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू करणार
*रत्नागिरी आणि सोलापूर येथे पुढील शैक्षणिक वर्षापासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करणार
* तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांच्या थकित वेतन आदा करण्यासाठी निधीची तरतूद करणार
*तासिका तत्वावर भरतीसाठी सेट नेट उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार
* प्राध्यापकांची कायमस्वरुपी भरती करता यावी यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार