सोलापूर - वीज कंपनीकडून ग्राहकांना आव्वाच्या सव्वा बिल देण्यात येत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी वीज कंपनीच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. यावेळी वीज कंपनीकडून ग्राहकांचे समाधान करण्याऐवजी उडवा-उडवीची उत्तरे दिल जात होती. यामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला.
सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या कुंभारी येथील विडी घरकुलमध्ये राहणाऱ्या नागरिकांना वीज वितरण कंपनीकडून हजारो रुपयांची बिले देण्यात आली आहेत. मीटरचे रिडिंग न घेता हजारो रुपयांची बिले आल्यामुळे या भागातील वीज ग्राहक वैतागले आहेत. विडी घरकूल भागात विडी कामगार राहतात. या कामगारांच्या कुटुंबाचा विजेचा वापरच कमी असतानाही त्यांना तब्बल 72 हजार रुपयाचे वीज बिल आले आहे. यामुळे या ग्राहकांना धक्काच बसला आहे. अशाच पद्धतीने मीटरचे रिडिंग न घेता हजारो रुपयांचे बिल आल्यामुळे संतप्त वीज ग्राहकांनी बुधवारी कुंभारी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना विचारणा केली.
ग्राहक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आल्यानंतर त्यांना उडवा उडवीची उत्तरे मिळाली. यामुळे ग्राहकांनी कार्यालयात एकच गोंधळ घातला. या गोंधळामुळे पोलिसांना बोलावण्यात आले आणि ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलाची आकारणी का होत आहे, याचे कोणतेही उत्तर न देता त्यांना कार्यालया बाहेर काढण्यात आले.