पंढरपूर - कोरोना विषाणूचा प्रचंड वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आसपासच्या पाच गावांमध्ये सात दिवसांच्या संपूर्ण संचारबंदीला शुक्रवारी प्रारंभ झाला. संचारबंदीचा प्रभावी अंमल होण्यासाठी सकाळपासूनच पोलिसांनी रस्त्यावर गस्त वाढविली आहे. तसेच दुसरीकडे पंढरपूरकरांनी या संचारबंदीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सार्वत्रिक चित्र दिसून आले.
संचारबंदीच्या काळात कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने विठ्ठल मंदिर परिसरातील मधुमेह, रक्तदाब व इतर आजार असलेल्या व्यक्तींच्या जलद चाचण्या घेण्यासही सुरुवात केली आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्या 700च्या दिशेने वाटचाल करीत आहे. शहराच्या बरोबरीनेच आता ग्रामीण भागातही बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. दूध व गॅस घरपोच पुरवठा आणि औषध दुकाने वगळता संपूर्ण संचारबंदी करण्यात आली आहे. गुरुवारी नागरिकांनीही जीवनाश्यक वस्तूंची खरेदी केली आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत बाजारपेठांमध्ये खरेदीची धांदल सुरू होती.
संचारबंदीचा अंमल कडक राहण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. पंढरपूर शहर येणार मार्गावर नाकेबंदी केली आहे. पंढरीतील दैनंदिन व्यवहार ठप्प होऊन सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. शहरातील विठ्ठल मंदिर परिसर, नवीपेठ, सावरकर चौक, कॉलेज चौक, जुनी पेठ, डॉ. आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी चौक आदी सर्व सतत वर्दळ असलेल्या भागात शांतता असल्याचे चित्र दिसले.
संचारबंदी काळात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संशयित रुग्णांसह वृध्द व मधुमेह, रक्तदाबासारख्या जुन्या आजारांशी संबंधित व्यक्तींच्या जलद चाचण्या घेण्यासही सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात चाचण्या घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर परिसरात घरोघरी सर्वेक्षणाचे कामही चालूच राहणार आहे.