सोलापूर - शहरात 27 एप्रिल सोमवारपर्यंत संपूर्ण संचारबंदी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शहरातील प्रत्येक व्यक्तीचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण संचारबंदी शिथील करण्यात येईल. सोमवार पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. सोलापूरचे नवनियुक्त पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (गुरूवारी) कोरोनाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढाव बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आढावा घेतला.
बैठकीत त्यांनी सध्या सुरू असलेली शहरातील संपूर्ण संचारबंदी ही सोमवार पर्यंत वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणीदेखील संपूर्ण संचारबंदी लावण्याच्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व औषधी दुकानदारांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणीही तापाचे औषध आणि गोळ्या देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. यावर लवकर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या 4 ने वाढून 37 इतकी झाली आहे. ती वाढू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.