सोलापूर - सोलापूर शहरातील देगाव येथील नाल्यामध्ये भली मोठी मगर आढळून आली आहे. नाल्याच्या घाण पाण्यामध्ये ही मगर वास्तव्यास असून या मगरीचा मूक्त संचार सुरू आहे. नाल्यातील घाण पाण्यात मगरीचे वास्तव आढळून आल्यानंतर देगाव भागाचे स्थानिक नगरसेवक गणेश वानकर यांनी तात्काळ फोन करून मंत्री आदित्य ठाकरे यांना या मगरीच्या मुक्त संचारामुळे स्थानिकामध्ये असलेल्या भितीच्या वातावरणाची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन या ठिकाणची पाहणी केली आहे.
देगाव परिसरातील नाल्यामध्ये मूक्त संचार करत असलेल्या या मगरीच्या वास्तव असलेल्या ठिकाणाची पाहणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील केली. त्यानंतर या ठिकाणी मगरीला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मगरीला इंजेक्शन देऊन पकडण्याचा उपाय होता. मात्र मगर घाण पाण्यात असल्यामुळे हा उपाय करता येणे शक्य नाही, तसेच जाळी लावणे देखील शक्य होत असल्यामुळे मगरीला पकडण्यासाठीचे प्लॅनिंग वनविभागाकडून करण्यात येत आहे, असे वन परिमंडळ अधिकारी चेतन नलावडे यांनी सांगितले आहे.
मोठी मगर व तिच्या सोबत असलेल्या आणखी दोन मगरीचे वास्तव्य हे नाल्यातील घाण पाण्यात शंभर मिटरच्या परिसरातच असल्यामुळे या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा सापळा लावण्यात येणार असल्याचे चेतन नलावडे यांनी सांगितले आहे.