सोलापूर - राज्यात बहुप्रतिक्षित कोविड लस देण्यात येत आहे. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात या लसीकरणाला आरंभ झाला. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांना कोविडची पहिली लस देण्यात आली. लसीकरण केंद्रात गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. लसीकरण केंद्राचे उद्घाटन प्रांताधिकारी सचिन ढोले व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या हस्ते करण्यात आला.
28 दिवसानंतर लसीकरणाचा दुसरा डोस
पहिल्या टप्प्यातील लसीकरणात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांना परिचारिका मंगल कर्चे यांनी पहिली कोविड लस दिली. पहिल्या टप्प्यात 1 हजार 610 डोस उपलब्ध झाले असून, तालुक्यातील डॉक्टर्स व आरोग्य सेवा देणाऱ्या संबंधित कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी कोविन अॅपवर यादी संकलित करण्यात आली आहे. पहिली लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरी लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा - सोलापुरात कंटेनरने तिघांना चिरडले, पुण्याच्या संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती
मधुमेह, उच्च रक्तदाब, इतर दुर्धर आजार तसेच गरोदर माता, स्तनदा माता यांना या लसीकरणातून वगळण्यात आल्याचे यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी सांगितले. तर, लसीकरण केंद्रासमोर नगर परिषदेचे माजी आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी गो कोरोना..गो कोरोना, अशा घोषणा दिल्या.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली कारभार
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात लस केंद्रावर लसीकरण कक्ष, प्रतिक्षा कक्ष, निरीक्षण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी संबधितांनी नोंदणी करताना जे ओळखपत्र जोडले आहे, ते घेवून येणे. लाभार्थी लसीकरण कक्षात आल्यानंतर त्यांची माहिती घेवून तसेच तापमान, ऑक्सिजन तपासणी करूनच लसीकरण केले जाणार आहे. लसीकरण कक्षातून लस दिल्यानंतर संबधिताला अर्धा तास निरीक्षण कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार विवेक सांळुखे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा - जिल्ह्यतील 590 ग्रामपंचायतींसाठी मतदान