सोलापूर - राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठे थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेचा सामान्य माणसांबरोबर नवजात बालक व लहान मुलांनाही फटका बसत आहे. गर्भवती महिलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. आईमुळे नवजात बालकांनाही कोरोना लक्षणे येत असल्यामुळे पंढरपूर येथे बाल रोग तज्ज्ञ डॉ. शीतल शहा यांच्या प्रयत्नातून राज्यातील पहिले बाल कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. यामध्ये नवजात बालक व लहान मुलांना कोरोनावर उपचार मिळण्यासाठी 15 बेडची अत्याधुनिक अशी सोय करण्यात आली आहे.
हेही वाचा - सोलापुरात शनिवारी 2 हजार 233 जणांना कोरोनाची लागण
जिल्हा प्रशासनाकडून बाल कोविड रुग्णालयाला मंजुरी
पंढरपूर येथील बाल रोग तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असणारे डॉक्टर शितल शहा यांनी नवजात बालक व लहान मुलांमध्ये कोविडची लक्षणे दिसू येत होती. त्यामुळे, पंढरपूर येथे बाल कोविड रुग्णालये उभारणे गरजेचे झाले होते. त्यासाठी डॉक्टर शितल शहा यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे बाल कोविड रुग्णालयासंदर्भात प्रस्ताव दिला. नवजात शिशू व लहान मुले कोरोनाबाधित होत असल्याने डॉ. शितल शहा यांच्या बाल कोविड रुग्णालयाला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली.
रुग्णालयात सुसज्ज उपकरणे
डॉक्टर शितल शहा यांच्याकडे अत्याधुनिक कॅथ लॅबसह सुसज्ज उपकरणे, प्रशिक्षित डॉक्टर, कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे. सध्या शहा यांच्या रुग्णालयामध्ये 82 नवजात बालके उपचार घेत आहेत. कोरोनाची लक्षणे दिसत असलेले 15 नवजात बालके व लहान मुले कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. डॉक्टर शीतल शहा यांनी स्वखर्चाने पंधरा बेडचे अत्याधुनिक असे दुसर्या इमारतीवर बाल कोविड रुग्णालय उभारले आहे.
हेही वाचा - दत्तात्रय भरणेंनी उजनीचे पाणी चोरल्याचा आरोप, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धरणात जलसमाधी आंदोलन